बारामती : गणपती विसर्जनाच्या दिवशी भांडणे सोडवल्याचा राग मनात ठेवून १४ जणांनी लोखंडी गज, तलवार, कोयता, दगडे घेऊन एका कुटुंबावर सशस्त्र हल्ला चढवला. या हल्ल्यात तब्बल ९ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम, २ लाखांचे दागिने लुटमार करुन एक चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास बारामतीतील शिरवली येथे घडली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी दिलिप पांडुरंग पोंदकुले (रा. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे ) यांनी माळेगांव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अक्षय महादेव चव्हाण, सलमान रशिद शेख, सागर महादेव कावळे, बाबु शिवाजी जाधव, रोहन बर्गे, किरण संपत जगताप (सर्व रा. शिरवली, ता.बारामती, जि. पुणे) आणि इतर ७-८ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप यांनी आरोपी अक्षय चव्हाण याची गणपती विसर्जनाच्या दिवशी भांडणे सोडवली होती. फिर्यादीच्या घरावर तसेच मोटार सायकलवर २२ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास दगड पडण्याचा आवाज आला. आरोपी व इतर सात-आठ जणांनी हातात लोखंडी गज, तसेच तलवार कोयता आणि दगडे घेऊन त्यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी फिर्यादी आणि त्यांचे कुटुंब स्वयंपाक घरात लपले होते. आरोपींनी घरातील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
दरम्यान, या गोंधळाचा आवाज ऐकून फिर्यादी यांचा भाऊ नितीन पांडुरंग पोंदकुले घटनास्थळी आले. मात्र, त्यांच्या पोटावर व अनिता राजेंद्र कोकणे हिच्या छातीवर महादेव पांडुरंग पोंदकुले यांच्या गुडघ्यावर दगड मारुन गंभीर जखमी केले. जनाबाई पोंदकुले यांच्या उजव्या पायाच्या घोट्याजवळ लोखंडी गजाने जोरात मारहाण केली. यावेळी काही ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाल्यावर आरोपींनी दुचाकीवर पळ काढला.
फिर्यादी हे स्वयंपाक घरातून बाहेर आल्यावर घरातील वस्तू त्यांना अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसल्या. फिर्यादी दिलीप यांनी जमिन खरेदी करण्यासाठी जमा केलेली रोख रक्कम तब्बल ९ लाख ८० हजार रुपये तसेच २ लाख रुपयांचे दागिने असा ११ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. शिवाय चारचाकी इर्टिका व ज्युपीटर या दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अमोल खटावकर करीत आहेत.