सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे दुर्मिळ असे फुलपाखरू आढळून आले आहे. जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरू पैकी एक असलेले ‘ऍटलास माॅथ’ सांगलीच्या शिराळा येथील बस स्थानक शेजारी असणाऱ्या पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात दिसून आले आहे. सकाळी नऊ वाजलेपासून संध्याकाळी साडे सातपर्यंत येथे लावण्यात आलेल्या पडद्यावर बसलेले होते. याच्या पंखाच्या टोकाला नागाचे तोंड व आकार असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे हे फुलपाखरू पाहण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली त्यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीच्या शिराळा येथील व्यावसायिक संजय यादव, राजेंद्र सावंत, सुनंदा सावंत, पूजा सावंत यांनी हे फुलपाखरू सर्वप्रथम पाहिले आहे. जवळपास अकरा इंच मोठे हे फुलपाखरू होते. महत्त्वाचे म्हणजे याच्या दोन्ही पंखाच्या टोकाला नागाच्या तोंड व आकार दिसत होता. त्यामुळे येथील नागपंचमी, जिवंत नाग पूजा आणि आज फुलपाखरूच्या दोन्ही पंखावर नागाचे तोंड यामुळे संजय यादव, पूजा सावंत यांनी फोटो काढले. काहींनी गुगलवर या प्रजातीबद्दल माहिती शोधली असता ते दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले ‘ऍटलास माॅथ’ असल्याचे समजले.
सर्वात मोठ्या पतंगांमध्ये ऍटलस माॅथ..
दक्षिण-पूर्व आशियात आढळतो हा जीव जगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये “ऍटलस माॅथ” मध्ये याची गणती होते. त्याचा रंग आकर्षक बदामी- तपकिरी व किंचित लालसर असतो. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला “ऍटलास माॅथ” म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते.
सुरवंट (आळी) असतांनाच भरपूर खाऊन घेतलेले असते. या फुलपाखरूचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसाचे असल्याने या अल्प कालावधीमध्ये अंडी घातल्यानंतर फुलपाखरू मृत पावते. शक्यतो रात्रीच दिव्यांचे प्रकाशाकडे आकर्षीत होणारे हे फुलपाखरू निशाचर आहेत. क्वचितच ते दिवसा आढळून येतात. मात्र, सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात प्रकर्षाने ते दिसतात.