पिंपरी : गुन्हेगारींच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. अशातच खेड तालुक्यातील मौजे येथे दोन जणांनी तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडका मारुन बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडली आहे.
शुभम भागवत पोळ आणि प्रदीप भागवत पोळ ( रा. चाकण) असे आरोपींची नावे आहेत. याबाबत एका 19 वर्षाच्या तरुणीने चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मावस भाऊ विलास सुरेश भिडे हा फिर्यादीची बहिण हिला मोटारसायकलवरुन घेऊन फिर्यादीच्या घरी निघाला होता. त्यावेळी तो मुटकेवाडी सिग्नलजवळ आल्यावर तेथे शुभम पोळ याने विलास याच्याबरोबर भांडण काढून ‘ही तुझी बायको आहे का? तिला तू गाडीवरुन का फिरवतोस? असे म्हणाला. त्यानंतर त्याने प्रदीप पोळ याला बोलावून घेतले. प्रदीपने सोबत आणलेल्या लाकडी दांडक्याने विलासला डोक्यात जोरदार मारहाण केली. त्यावेळी तो खाली पडल्यावर शुभमने प्रदीप याच्या हातातील लाकडी दांडके घेऊन विलासच्या डोक्यात पुन्हा वार केला. त्या मारहाणीत विलास बेशुद्ध झाला. हे पाहून प्रदीप पोळ मोटारसायकलवरुन पसार झाला.
यावेळी पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार तरपाडे करीत आहेत.