अहमदनगर : एकीकडे आज राज्यभरात गणपती बाप्पाला दात अंतकरणाने निरोप दिला जात आहे. परंतु, दुसरीकडे अहमदनगर येथील पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर मोरे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
काल दुपारी तोफखाना पोलीस स्टेशनच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत त्यांनी डान्स केला असल्याची माहिती समोर येत आहे. मिरवणूक संपून घरी जाताच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे हे अहमदनगर पोलीस दलात कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता. दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी डान्स सुद्धा केला होता.
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू..
या मिरवणुकीत ज्ञानेश्वर मोरे यांनी मराठी गाण्यावर भन्नाट डान्स करत सर्वांची वाहवा मिळवली होती. गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर ते आपल्या घरी गेले. घरी गेल्यावर ज्ञानेश्वर मोरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचे दुःखद निधन झाले. या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.