नवी दिल्ली: यंदाच्या वर्षाअखेरीस हवामानातील निना’ घटकामुळे देशात कडाक्याची थंडी पडू शकते, असा अंदाज जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) व्यक्त केला आहे. प्रामुख्याने उत्तर भारतात पारा अधिक खाली घसरणार आहे. जगभरातील वेधशाळांकडील माहितीच्या आधारावर सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान तटस्थ स्थिती (म्हणजेच अल निनो आणि ला निना यांपैकी कोणीही प्रबळ नाही) ला निनामध्ये परावर्तित होण्याची शक्यता ५५ टक्के आहे.
येत्या ऑक्टोबर ते पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत ला निना प्रबळ होण्याची शक्यता ६० टक्क्यांपर्यंत वाढते. त्यावेळी अल निनो प्रबळ होण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल हवामानाच्या या घटकाचा थंडीवर देखील परिणाम होईल आणि सामान्यापेक्षा अधिक थंडी पडेल, असा डब्ल्यूएमओचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने डब्ल्यूएमओच्या अंदाजाला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
प्रशांत महासागरात मध्य व पूर्व भूमध्य रेषेवर समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने निर्माण होणाऱ्या भौगोलिक स्थितीला ला निना म्हटले जाते. ला निना आणि अल निनो या घटकांवर भारतातील मान्सूनची वाटचाल अवलंबून असते. ला निनामुळे चांगला पाऊस पडतो तर अल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु, या नैसर्गिक घटकांवर मानवामुळे होणाऱ्या हवामान बदलाच्या घटनांचाही परिणाम होत आहे.