पुणे : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आणि प्रेरणा आहे. त्यांचे स्मारक राज भवनावर व्हावे, ही संभाजी ब्रिगेडची गेली अनेक वर्षा पासूनची मागणी आहे.पण राज्य सरकारला केवळ निवडणुका आल्यावरच शिवस्मारक आठवण होते. मात्र, आगामी काळात राज्यभावनावर शिवस्मारक व्हावे, यासाठी संभाजी ब्रिगेड राजभवनावर ‘कुदळ मोर्चा’ घेऊन जाणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी आज दिला आहे.
संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय ‘लोकशाही जागर महामेळावा आज (दि. 23) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. महामेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अँड. मनोज आखरे बोलत होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना मनोज आखरे म्हणाले, फसणवीस सरकार असताना त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक तयार करण्याचा घाट घातला होता. मात्र तेथे एक वीट सुद्धा बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यासाठी तरतूद करण्यात आलेले 2700 कोटी रुपये हे पाण्यात गेले. तेव्हा देखील संभाजी ब्रिगेडने शिवस्मारक राजभवन येथे साकारावे, अशी मागणी केली होती. पण त्या मागणीला सरकारने गांभीर्याने घेतले नाही. आता संभाजी महाराजांच्या पुतळ्यांचे आंदोलन झाल्यावर आपल्याला शिवस्मारकाचे आंदोलन हाती घ्यायचे आहे. यासाठी आगामी काळात संभाजी ब्रिगेड राजभवनावर ‘कुदळ मोर्चा’ घेऊन जाणार आहे.
मेळाव्या मागची भूमिका स्पष्ट करून महासचिव सौरभ खेडेकर म्हणाले, आपल्या देशाच्या शेजारी जी अवस्था आहे, त्याकडे पाहता आपण अधिक जागृत होवून काम केले पाहिजे. आगामी काळात काही लोकांचा ‘कार्यक्रम’ करण्याची आता गरज आहे. तसेच महाराष्ट्राला संघटना फोडणे, पक्ष फोडणे या गोष्टी नवीन नाहीत; पण अशा लोकांचा बंदोबस्त करणे देखील गरजेचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला सन्मान जनक जागा मिळाल्या तर आपलेही प्रतिनिधी विधानसभेत जातील. मात्र सन्मान जनक जागा न मिळाल्यास आपण पक्षासाठी वेगळी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा देखील खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
‘सेल्फी विथ पांदण’ पाठवून मुख्यमंत्र्यांचे पोर्टल जाम करा
विकासाच राजकारण करणारे सरकार सध्या सरकारी योजनांची खिरापत वाटत आहे. पण आपल्याला परिवर्तनाच राजकारण करायच आहे. सरकारचा विकास आपल्या गावापर्यंत आणि शेतापर्यंत आला आहे का? असा सवाल उपस्थित करून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अँड. मनोज आखरे यांनी कार्यकर्त्यांना गावाला शेताला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था दाखवणाऱ्या रस्त्यांचे फोटो ‘सेल्फी विथ पांदण’ काढून मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर उपलोड करण्याचे आवाहन केले. तसेच संबंध राज्यातून इतके फोटो पाठवा की मुख्यमंत्र्यांचे पोर्टल जाम झाले पाहिजे, असे ही सांगितले .
संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे आंदोलन पुन्हा पेटणार
जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानात गडकरींच्या पुतळ्या ऐवजी संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा, यासाठी मागील काळात संभाजी ब्रिगेडने आंदोलन केलं होतं. महिन्याभरापूर्वी यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तता देखील झालेली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पुणे महापालिकेने संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा न उभारल्यास संभाजी ब्रिगेड स्वतः तो पुतळा उभारू. मग आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी यावेळी दिला.
विनेश फोगाटचा भव्य सत्कार
केंद्र सरकारच्या कपट राजकारणाने भारताची लेक विनेश फोगाट हिचा बळी घेतला. भारत सुवर्ण पादकाला मुकला. पण ‘भारत के सन्मान मे संभाजी ब्रिगेड मैदान मे’, असे म्हणत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड. मनोज आखरे यांनी भारताची कुस्तीपट्टू विनेश फोगाट हिचा कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरात सप्टेंबर महिन्यात भव्य सत्कार करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी तिला सुवर्ण पदक देवून सन्मानीत करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.