लोणी काळभोर : येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 च्या लोणी काळभोर येथील विद्यार्थी व शिक्षिकांनी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना राख्या बांधत अनोख्या पद्धतीने हा सण साजरा केला. समाजातील सर्व घटकांचे रक्षण करण्याचे कार्य पोलिसांकडून होत असते. पोलिसांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, रत्नदीप बिराजदार, अमोल घोडके, पोलीस हवालदार ज्योती नवले, पोलीस हवालदार रामदास मेमाणे, रवी आहेर यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
राजेंद्र करणकोट यांनी मुलींना तक्रार दाखल कशी करावी, महिला व मुली याविषयी विशेष कायदे, मुलांची सुरक्षितता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पोलिस ठाण्यातील व्यवस्थापन, पोलिस कोठडी याविषयी माहिती देऊन रक्षाबंधनच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
ज्योती नवले यांनी सर्व विद्यार्थिनींना सुरक्षाविषयक, सामाजिक व भविष्यविषयक बाबींवर मार्गदर्शन केले. समाजाचे रक्षण करत असताना पोलिसांना स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. ‘खाकी’मधल्या मानवी मनाविषयी आपुलकी दाखविणाऱ्या या बालिकांच्या कृतीचे सर्वच पोलिस दलाने कौतुक केले. समाज रक्षणासाठी कार्य करणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे हे अनोखे रक्षाबंधन सर्वांसाठीच आदर्शवत ठरले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे शिक्षक रघुनाथ शिंदे, लता वाळके, संजय पापळ, सोमनाथ शेंडकर यांनी केले. मनीषा काळे, रोहिदास मेमाणे, कौशल्या मेमाणे, मनीषा टिळेकर, पूजा शेटे, बेबी जगदाळे, अनुराधा वाघमारे, प्रभावती पवार, प्रिती कामठे, सुनील जाधव, दत्तात्रय मेमाणे या सर्व शिक्षक वृंदाने मोलाचे सहकार्य केले.
दरम्यान, या कार्यक्रमानिमित्त पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व विद्यार्थिनींना कॅटबरी चे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद शाळा लोणी काळभोर क्रं 2 च्या सर्व शिक्षक वृंदाने केले. यामध्ये इयत्ता 6 वी, इयत्ता 7 वी च्या सर्व विध्यार्थिनींनी स्वतः बनविलेल्या राख्या सर्व पोलीस कर्मचारी यांना बांधण्यात आल्या.