पुणे : पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या व्यक्तीची विचारपूस करून त्याची तक्रार नोंदविण्यास नेहमीच दिरंगाई केली जाते. यामागील कारण विचारले असता कधी तक्रारीत तथ्य नाही तर हद्दीचे कारण सांगितले जाते. परंतु पोलीसांना आता हद्दीचे कारण न देता झिरो एफआयआर नोंदवून संबंधित पोलीस ठाण्यात तो हस्तांतरीत करता येणार आहे. शिवाय तक्रारदाराला घटना कोठे घडली ही बाब विचारात न घेता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविणे शक्य होणार आहे.
कोणतीही घटना, अपघात किंवा गुन्हेगारी घटनेच्या प्राथमिक माहितीला एफआयआर म्हणतात. गुन्हा कोणत्याही ठिकाणी घडो, त्यांची नोंद आपल्या जवळच्या किंवा सोयीस्कर ठाण्यात करता येते. यालाच झीरो एफआयआर म्हटलं जातं. दुसऱ्या ठाण्यात नोंद करण्यात आलेल्या या तक्रारीला कोणताही विशेष नंबर दिला जात नाही, त्यामुळे त्याची नोंद ही झीरो एफआयआर अशी केली जाते.
संसदेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अधिनियम पारित केला आहे. त्याची अंमलबजावणी एक जुलै 2024 पासून सुरु झाली आहे. गृहमंत्रालयाने नवीन फौजदारी कायद्याच्या अनुषंगाने झिरो एफआयआर आणि ई-एफआयआर नोंदवण्यासाठीआदर्श कार्यप्रणाली निश्चित केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिला आहे.
कुठलीही घटना घडली की, सामान्य माणूस पोलिसांकडे तक्रार करायला जातो, पण सर्वसामान्यांना कायद्याची पूर्ण माहिती नसते, असे अनेकदा दिसून येते. त्यामुळे त्यांना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात जावे लागते तेव्हा त्यांना त्रास होतो. मात्र आता कोणतेही पोलीस स्टेशन एफआयआर नोंदवू शकते.
ई- एफआयआर कसा नोंदवायचा?
– तक्रारदाराला ई-एफआयआर पोर्टल, पोलीस संकेतस्थळ किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तक्रार देता येऊ शकते.
– तक्रार नोंदवताना वैयक्तिक माहिती, घटनेचा तपशील आणि पुरावे द्यावे लागणार आहे.
– संबंधित व्यक्तीने तीन दिवसांत स्वाक्षरी केल्यावर ती रेकॉर्डवर घेऊन अधिकारी त्याची नोंद करतील.