हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण विरोधी पथकाने पुणे – सोलापूर महामार्गाच्या दुतर्फा अनेक वर्षे ठाण मांडून बसलेली आणि मार्गाच्या रूंदीकरण कामास अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्याचा धडाका सुरू केला आहे. मात्र हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या ‘बड्या’ तेल कंपन्यांनी केलेले अतिक्रमण तसेच लोणी स्टेशन परिसरातील महामार्गाच्या बाजूला असलेले अतिक्रमण निघणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मीटर (सुमारे पन्नास फुट) अंतराच्या आतील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यास सोमवारी (ता. १४) एनएचएआयच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सुरूवात केली आहे. यामध्ये पदपथावरील, पथारी व्यावसायिक विक्रेत्यांची अतिक्रमणे ताब्यात घेण्यापासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर इमारतींना लागून केलेल्या पत्राशेड व इतर तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणांवरही जेसीबी यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. मात्र हि कारवाई अत्यंत संथ गतीने सुरु आहे.
अतिक्रमणे वाचविण्यासाठी येणारा राजकीय दबाव निष्फळ ठरत असून साहजिकच कारवाईतील मोठे नुकसान टाळण्यासाठी लोक स्वतःहूनच अतिक्रमण काढून घेत असल्याचे दिसून येत आहे. कवडीपाट टोलनाका ते लोणी स्टेशन परिसरात नागरिक स्वतःहून फॅब्रिकेशन व्यवसायिकांकडून अतिक्रमण काढून घेत आहेत. मात्र हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या तेल कंपन्यांनी केलेले अतिक्रमन निघणार का याबाबत नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या वतीने विशिष्ट प्रकारे खुणा, अथवा कायमस्वरूपी न निघणारे सिमेंटचे खांब रोवण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. तसेच ग्रामपंचायत, महसूल विभाग यांच्या ताब्यातील जागांची माहिती नकाशासह तयार करून त्याची सूची आपापल्या कार्यालयात ठळकपणे लावण्यात यावी.