सांगवी, (बारामती) : बारामतीमध्ये बनावट व्यक्ती व आधार कार्ड बनवून खोट्या व्यक्तीच्या मदतीने दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर उभे करून माजी सैनिकाच्या ३ एकर जमीनीचा परस्पर व्यवहार करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय बारामती येथे हा प्रकार घडला आहे.
याबाबत फिर्यादी महादेव विठ्ठल कुंभार (वय-६७, व्यवसाय सेवानिवृत्त सैनिक, रा. भिगवण रोड, पंचायत समितीजवळ, साईनगर बारामती, जि. पुणे) यांनी जमीन बळकावून फसवणूक केल्याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी (बनावट आधार कार्ड बनवलेला) महादेव विठठल कुंभार (रा. मदनेवस्ती पिराळे नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापुर), नितीन पंढरीनाथ दांगट (रा. वडगाव बु. हवेली, जि. पुणे), गणेश एकनाथ मगर, (रा. मगरपटटा, हडपसर, ता. हवेली, जि. पुणे), अशोक केरभाउ भोरडे (मु. पो. पिंपरी सांडस, ता. हवेली जि. पुणे) व इतर ५ ते ६ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाकडून सीलिंग मधून माझी सैनिक कुंभार यांना बारामती तालुक्यातील मूर्टी येथे ३ एकर जमीन मिळाली होती. तेथील एकूण ११८ गुंठे जमीन आरोपींकडून बळकावण्यात आली आहे. मूर्टी येथील त्याच शेतीच्या गटात आणखी एकाची माजी सैनिक कुंभार यांच्या प्रमाणेच फसवणूक झाल्याचे कुंभार यांच्या नातेवाईकांनी माहिती दिली.
आरोपी यांनी संगणमत करून बनावट आधारकार्ड बनवुन सेवा निवृत्त सैनिक महादेव कुंभार असल्याचे भासवुन त्यांची जमिन बेकायदेशिररित्या बळकावण्यासाठी दुय्यम निबंधक बारामती यांच्या कार्यालयात खोटा बिगर ताबा साठेखत दस्त क्र. १४६६/२०२४, १६ फेब्रुवारी २०२४ रोजी करून फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत आरोपींचा तपास सुरू असून अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे बारामती शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पुढील तपास पोळीचे करत आहेत.