लोणी काळभोर: लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बेट परिसरात खुलेआम सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (ता. 16) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी सुमारे 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर ५ जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्यात मोठी आर्थिल डील झाल्यानंतर 7 जणांची सुटका करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
सागर बाळासाहेब गाढवे (वय २८ धंदा-गाढवे मळा, थेऊर फाटा कुंजीरवाडी ता-हवेली, जि. पुणे), अर्जुन पन्नालाल येरवार (वय २४, रा लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे), पांडुरंग निवृती राखपसरे (वय ३९, बेटवस्ती, लोणी काळभोर, ता हवेली, जि. पुणे), आकाश बाळकृष्ण राजपुरे (वय २८, धंदा शेती रा. बेटवस्ती, लोणी काळभोर), रविंद्र विष्णु राखपसरे (वय २९, बेटवस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत सदाशिव कळसकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार प्रशांत कळसकर हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावीत असताना, त्यांना बेट परिसरात अवैध जुगार अड्डा सुरु आहे, अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलिसांचा 10 ते 12 जणांचा मोठा फौजफाटा कारवाई करण्यासाठी रवाना झाला.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, वरील 5 जण संगनमत करुन ५२ पानी पत्त्याचा जुगार चालवत असताना मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व 8 हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. तर, आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.
मोठ्या डीलनंतर 7 जणांची सुटका?
लोणी काळभोर पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी 20 पेक्षा अधिक लोक आढळून आले. त्यामधील सात जण हे जुगार अड्डा चालवीत होते. तर तेरा जण जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर 7 ते 8 जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, तर उर्वरित 10 ते 12 जणांना जुगाराच्या मुद्देमालासह लोणी काळभोर पोलिसांनी पकडले होते. सर्व आरोपींना लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खूप मोठी आर्थिक डील झाल्यानंतर 5 ते 7 जणांची सुटका करण्यात आली, अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. याप्रकरणी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
जुगाराचा धंदा चालविणे किंवा जुगार खेळणे हा कायद्याने गुन्हा आहे. लोणी काळभोर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर 5 जुगार चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, उर्वरित दोन जुगार चालक व जुगार खेळणारे नागरिक गेले कुठे? की जुगार चालकच जुगार खेळत होते? पाच जणांवरच गुन्हा दाखल करण्यापाठीमागचे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.