लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वेहेरगाव येथे मोठी कारवाई केली आहे. बेकायदा जुगार अड्ड्यावर छापा टाकून ड्रग्स सह पाऊण कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शन खाली लोणावळा पोलिसांनी सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या 10 व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.
राहुल भरत इंगुळकर (वय- 34 वर्ष रा. वाकसई, मावळ) संतोष ज्ञानदेव बोत्रे (वय-36) मंगेश विठ्ठल देशमुख (वय-46) संजय विठ्ठल देशमुख (वय-43) दिनेश पांडूरंग गायकवाड (वय-40), चंद्रकांत हौजी देवकर (वय- 42 वर्ष), विनोद शरद नाणेकर (वय- 42), अजित सुनिल देवकर (वय- 29 ) संतोष काशिराम दळवी (वय -45) सर्व रा. वेहेरगांव), मंगेश मारुती राणे (वय -40 वर्ष रा. कामशेत , मावळ) अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील वेहेरगाव येथे एका अज्ञात व्यक्तीच्या घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे. त्यावरून पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी सोमवारी रात्रीच्या वेळी त्यांच्या पथकासह सापळा रचुन वेहेरगाव येथील मडवी यांच्या बंगल्यामध्ये छापा टाकला.
दरम्यान, या छाप्यामध्ये पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता आरोपी संतोष दळवी याने स्वतःच्या पॅन्टच्या खिशामध्ये 2.30 ग्रॅम वजनाचे 20 हजार 300 रुपयांचे एम.डी पावडर हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आणला होता. पोलिसांनी या कारवाईमध्ये सर्व आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम, वाहने आणि इतर साधने असा एकूण 74 लाख 14 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याचा पुढील तपास लोणावळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पोलीस पुढील तपास करत सागर अरगडे करत आहेत.