पुणे : पुण्यात नवी दिल्ली येथील अखिल भारतीय पोलिस क्रीडा नियंत्रण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या ७१ व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले.
यंदाच्या स्पर्धेचा मान पाच वर्षानंतर पुण्याला मिळाला असून या स्पर्धेचा प्रारंभ झाला आहे. हडपसर रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या क्रीडासंकुलात २० नोव्हेंबरपर्यंत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये कुस्ती, कबड्डी, मुष्टीयुद्ध , पॉवरलिफ्टिंग आणि शरीरसौष्ठव आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धेमध्ये २७ राज्ये, पाच केंद्रीय सशस्त्र पोलिस विभागांचे संघ, पाच केंद्रशासित प्रदेशांचे संघ असे एकूण ३७ संघ सहभागी होणार आहे.
१५९६ पुरुष आणि ६३२ महिला खेळाडू, प्रशिक्षक, सहायक असे एकूण दोन हजार ६३९ स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती राज्य राखीव पोलिस दलाच्या पुणे परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक दीपक साकोरे आणि राज्य राखीव पोलिस दला गट एकचे समादेशक प्रवीण पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान ,या स्पर्धेत विविध राज्यातील तसेच केंद्रीय पोलिस दलातील अर्जुन पुरस्कारप्राप्त, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी स्पर्धक सहभागी होणार आहेत. यामध्ये गौरव सिंग, राहुल आवारे, नरसिंह यादव, विजय चौधरी, नवीन मोर, मौसम खत्री, निर्मला देवी, गुरुशरण कौर, सुभाष पुजारी, हरप्रीत सिंग या अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.