काटेवाडी, (बारामती) : दुधात भेसळ केली जात आहे. काहींनी सांगितले की या विरोधात कडक कायदा आणा. आम्ही फाशीची मागणी केली होती, पण राष्ट्रपती यांनी आमची मागणी मान्य केली नाही. दूध भेसळ करणाऱ्यांवर आम्ही मोक्का लावणार, असा इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते बारामतीमध्ये बोलत होते.
तसेच पुढे बोलताना म्हणाले, मी महाराष्ट्र दौऱ्यावर निघालो असून फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. फाफट पसारा सांगणार नाही, पण आता कोण कुणाला ढेकूण म्हणत आहे. एकमेकांचे कपडे काढायचं बाकी ठेवतात. सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष घालण्याची गरज आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
पण आता आकडे टाकायचं बंद करा : अजित पवार
अजित पवार म्हणाले, लाईट बील तर भरायचा प्रश्नच नाही, पण आता आकडे टाकायचं बंद करा. कनेक्शन वगैरे व्यवस्थित घ्या. आज बिरोबा मंदिरात गेलो तेव्हा एकजणाने ट्रान्सफॉर्मर बघा असं सांगितलं, मी ते अधिकाऱ्यांना दाखवलं. सर्व गोष्टी सुरक्षित कशा राहितील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
सरकारमध्ये नसतो तर वीज माफी करता आली नसती
एका वर्षानंतर शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही जण आमच्यावर टीका करतात, हा चुनावी जुमला आहे, पण हे खोटं आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असून दोन जिल्ह्याचे खराब पाणी येते. त्यासाठी आपण खराब पाणी रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. मोठा निर्णय घ्यायचा म्हटलं तर कारखाने बंद करावे लागतील. तसेच शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं. सरकारमध्ये नसतो तर वीज माफी करता आली नसती. असंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.