पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. बहुतांश ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं बघायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत असून धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
‘या’ भागात रेड अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस..
वारणा नदीसोबतच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 30 फुटांजवळ पोहोचली आहे. कृष्णा नदी काठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यास सांगली महापालिकेकडून सुरुवात झाली आहे. कर्नाळ रोडवरील आरवाडे पार्क भागातील 3 कुटूंब स्थलांतरित, 9 मुलांसह 17 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
कळंबा तलाव ओव्हरफ्लो..
कोल्हापूर शहरानजीक असलेला कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. कळंबा तलाव हा ऐतिहासिक तलावातून याच तलावामधून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जात होता. आता हा तलाव 100 टक्के भरला असून तलावाच्या सांडव्यामधून पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळं एक प्रकारे धबधबा तयार झाला असून, नागरिक कळंबा तलावाचा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
निम्न वर्धा धरणाचे तीन दरवाजे उघडले
वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाचे तीन दरवाजे 30 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून यातून 77.87 घनमीटर प्रमाणे पाणी वर्धा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. वर्धा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.