पुणे: राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पावसामुळे नागरिकांना आता उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. गुरुवारीही राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस बरसत असून आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट आहे. दिवसभर वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार, आज बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि काही वेळा पावसाच्या सरी पडतील, तर आज रात्रीही अशीच स्थिती असणार आहे. सध्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर पश्चिम भागात चक्राकार वाऱ्यांची प्रणाली तयार झाली आहे. दरम्यान, कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर पूर्व अरबी समुद्रापासून पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पुढील 3-4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 3-4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ७ आणि ८ मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देशात आज पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी आज अवकाळी पाऊस बरसणार आहे.