पुणे: पावसामुळे महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात तापमानात सातत्याने वाढ झाल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. वाढत चालेल्या उकाड्यात लक्षणीय घट दिसून आली आहे. दरम्यान, राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून मराठवाड्यातही रिमझिम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 29 एप्रिलला मुंबईत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर पुण्यात 29 एप्रिलला किमान तापमान 21 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुण्याचे तापमान पाहता नागरिकांना तीव्र तापमानाचा सामना करावा लागणार आहे. नागपूरमधील किमान तापमान 24 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान 23 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. राज्यात चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागांसाठी हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट केला असून या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.