मुंबई: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून रायगड जिल्हा आणि पुणे घाट (Red alert for Pune) परिसरासाठी 28 सप्टेंबर 2025 रोजी ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसह सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange alert) जारी करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यभरात ‘सचेत’ या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्वसूचना दिल्या जात आहेत. हवामानाशी संबंधित पुढील अंदाजांसाठी भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राशी सातत्याने संपर्क साधून माहिती संबंधित जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.

नद्यांमध्ये पाणीपातळी वाढ, पूरसदृश परिस्थिती
सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे आणि टाकळी येथे भीमा नदी इशारा पातळीवर वाहत आहे. सीना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी ठेवण्यात येत आहे.
अहिल्यानगर (जामखेड, बीड) तालुक्यात अतिवृष्टीमुळे खैरी धरणातून सकाळी 9.30 वाजल्यापासून 16,743 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरडवाडी पुलावरून पाणी वाहत असल्याने जामखेड–खर्डा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा आणि भूम भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून NDRF ची दोन पथके पुणे येथून रवाना करण्यात आली आहेत.
बीड जिल्ह्यात 20 सर्कलमध्ये 65 मिमी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे प्रशासन सतर्क असून, स्थलांतराची तयारी ठेवण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात सरासरी 75.3 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. अहमदपूर तालुक्यात पूरपरिस्थिती असून छिलखा बॅरेजजवळ चार नागरिकांचे बचावकार्य सुरू आहे. जिल्ह्यात 60 रस्ते सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. NDRF चे एक पथक नांदेडहून लातूरकडे रवाना झाले आहे.
24 तासांत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली जिल्हे:
लातूर – 75.3 मिमी.
हिंगोली – 66.2 मिमी.
परभणी – 54.9 मिमी.
धाराशिव – 54.5 मिमी.
गडचिरोली – 53.5 मिमी.







