पुणे : मागील तीन दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, आजही पुन्हा एकदा पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांना पावसाचा सामना करावा लागणार आहे. दुपारनंतर पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
तसेच राज्यातही कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता कायम असणार आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यातील हडपसर परिसर जलमय झाल्याचे चित्र आहे. रस्त्याला नदीचे रुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळे येत आहे. पुन्हा आज आणि उद्या हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, उरुळी कांचन भवरापूर या गावांदरम्यान असणाऱ्या पुलारून रस्ता ओलांडणारा प्रशांत चांगदेव डोंबाळे (वय -३७, रा. दात्तार कॉलनी, उरुळी कांचन) हा तरुण पुरात वाहून गेला. काल सकाळी त्याची दुचाकी ओढ्यात सापडलीय. तरुणाचा अद्यापही शोध सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.