पुणे : शहरात पावसाचा इशारा कायम असून, सोमवारी पुणे आणि परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस हलका, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मान्सून पुण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे ढगाळ हवामान असून, पावसाच्या सरी पडत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत शिवाजीनगर येथे ७.६ मि.मी. पाऊस पडला आहे. तसेच वडगावशेरी ४, लोहगाव ३, कोरेगाव पार्क १.५ व मगरपट्टा येथे १ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी शहरात मान्सून दाखल झाल्यापासून अद्याप जोरदार पाऊस पडला नाही. शहरात पावसाला अनुकूल वातावरण आहे. तापमानात किंचित वाढ झाली असून, सोमवारी कमाल तापमान ३१.३. तर किमान तापमान २१.६ अंश सेल्सिअस तापमान होते. शहरात ११ ते १६ जून दरम्यान, आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान वाढून ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.