पुणे : राज्यात अवकाळी पावसाला अनुकूल वातावरण कायम आहे. रविवारी राज्याच्या काही भागांत पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात कमी दाबाचा पट्टा कार्यरत असल्यामुळे पावसाला पोषक हवामान गेले काही दिवस आहे. ढगाळ हवामानाबरोबर काही भागांत पाऊस पडत आहे. रविवारी कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आदी भागांत पावसाची नोंद झाली. पुढील आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.
यादरम्यान, मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. वातावरण बदलामुळे सध्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला येथे ४१.३ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे १८.१ अंश सेल्सिअस झाली आहे. पुढील आठवड्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने कमाल व किमान तापमानात घट होईल. बहुतांशी जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.२, लोहगाव ३८.६, जळगाव ४०, कोल्हापूर ३४, महाबळेश्वर २७.४, मालेगाव ३६.६, नाशिक ३३.२, सांगली ३५.७, सातारा ३५.३, सोलापूर ३९.९, मुंबई ३३.२, सांताक्रुझ ३४.६, रत्नागिरी ३३.७, डहाणू ३३.८, धाराशीव ३८.९, छत्रपती संभाजीनगर ३६.६, बीड ३९.२, अकोला ४१.३, बुलढाणा ३६.२, ब्रह्मपुरी ४०.१, चंद्रपूर ४०.४, गोंदिया ३९.४, नागपूर ३९.१, वाशिम ३८.६, वर्धा ४०, यवतमाळ ३९.