मुंबई : राज्यात काही दिवस झालेत पावसाचा जोर वाढला असून बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात सुद्धा वाढ झाली असून नदी, नाले तुडुंब वाहू लागले आहेत. आज मुंबईमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच, वातावरण ढगाळ राहील असा भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नवी मुंबई परिसरात मुसळधार..
मुंबई आणि परिसरामध्ये 24 तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवी मुंबई परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रात्री मुंबई आणि नवी मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच सकाळच्या सुमारात चेंबूर भागात जोरदार सरी बरसल्या.
राज्यात ‘या’ भागात पावसाचा इशारा..
हवामान विभागाने आज अनेक राज्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, नागपूर, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून पूर्व विदर्भामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे.
तसेच मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये ४ सप्टेंबरपासून पावसाची तीव्रता कमी होणार आहे. दक्षिण मराठवाड्यात काही भागात पाऊस पाहायला मिळू शकतो. छ. संभाजीनगर, जालना आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ४ सप्टेंबर रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे.
पुणे, अहमदनगर, नाशिकसह इतर जिल्ह्यात मध्यम पाऊस..
आयएमडीच्या अंदाजानुसार पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर इत्यादी २१ जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टी भागात मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.