पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. तर, सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधण्यात येत आहे. बाजारात सध्या सीएनजी वाहनांना मोठी मागणी असललेली दिसून येत आहे. चारचाकी सीएनजी वाहनांची बाजारात चलती असल्याचं पाहायला मिळते. त्यातच, आता बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आज पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेली, ही सीएनजी बाईक जगातील पहिली सीएनजी दुचाकी असल्याचा दावा बजाजकडून करण्यात आला आहे.
पेट्रोलच्या वाढत्या दराने त्रस्त झालेल्या दुचाकीस्वारांना आता पैसे मोजण्यातून लवरकरच मुक्तता होणार आहे. कारण, बजाजने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाईकची निर्मिती केली. ज्या बाईकचं अनावरण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं आहे. जगातील ही पहिली सीएनजी बाईक असल्याचा दावा बजाज कंपनीने केला आहे. या बाईकमुळं दुचाकीस्वारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
📍𝐏𝐮𝐧𝐞 | Live from the launch of World’s 🌏 First CNG Motorcycle 🏍️ of Bajaj Auto
https://t.co/1CpxcySoEU— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 5, 2024
सीएनजी बाईकची किंमत 1 लाखांपेक्षा कमी असावी : नितीन गडकरी
याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी या सीएनजी बाईकची किंमत 1 लाखांपेक्षा कमी असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रदूषणमुक्त भारत करण्याचं माझं सर्वात मोठं ध्येय आहे. त्याअनुषंगाने सीएनजी बाईक या ध्येयाला मोठा हातभार लावेल यात कोणती शंका नाही. वाहन उद्योग क्षेत्रात भारताचा आधी जगात सातवा नंबर होता. आता, अलीकडच्या तीन महिन्यांपूर्वीच आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचलो आहोत. पहिलं यूएसए, दुसरं चायना आणि मग भारताचा नंबर लागतो. आपण वाहन उद्योग क्षेत्रात भरारी घेतोय, असे गडकरी यांनी या बाईक लाँचिंग सोहळ्याप्रकरणी बोलताना म्हटले. सीएनजी बाईक ही “बजाजची गॅरंटी” आहे, असं आम्ही म्हणू शकतो. आता तुम्हीही तुमच्या भाषणात ‘नितीन गडकरींची गॅरंटी’ असा उल्लेख कराल, अशी अपेक्षा आहे.