नवी दिल्ली : सध्या नवनवीन टेक्नॉलॉजी पुढे येत आहे. त्यात रिलायन्स जिओकडून गुगलला टक्कर देण्याची योजना आखली जात आहे. त्यामुळे गुगलचे टेन्शन वाढत आहे. रिलायन्स जिओकडून क्लाउड स्टोरेज सेवा दिली जात आहे. रिलायन्सकडून तब्बल 50GB फ्री क्लाउड डेटा मिळत आहे.
Google कडून प्रत्येक Gmail युजर्सला 5 ते 15 GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळते. पण जर तुम्हाला जास्त स्टोरेज हवे असेल तर तुम्हाला गुगलला पैसे द्यावे लागतात. आता Reliance Jio ने एक नवीन प्लॅन आणला आहे. ज्याद्वारे मोबाईल यूजर्स 50GB पर्यंत क्लाउड स्टोरेज मोफत मिळवू शकणार आहेत. रिलायन्स जिओच्या या पाऊलामुळे गुगल आणि थेट जीमेल आणि त्याच्या संबंधित सेवांच्या अडचणी वाढणार आहेत. जिओने अधिकृतपणे त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनसह Jio AI-Cloud स्टोरेज सुविधा सुरू केली आहे.
2024 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) याची घोषणा करण्यात आली. परंतु यापूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये, Jio ने निवडक युजर्ससाठी 100 GB पर्यंत मोफत AI क्लाउड स्टोरेज दिला होता. मात्र, आता Jio ने सर्व प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड युजर्ससाठी 50 GB AI-क्लाउड स्टोरेज आणला आहे.