करमाळा: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे प्रचंड मोठे सावट असताना भीषण पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंभारगाव, घरतवाडी, देलवडी, भिलारवाडी, जिंती, सावडी अनेक गावे दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करताना हातबल झालेली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत व शासन दरबारी पाठपुरावा करूनही काहीही उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचे भीषण प्रश्न निर्माण झाले आहेत.
शासन दरबारी पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने प्रतिसाद मिळत नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वीच विहिरींनीही तळ गाठला आहे. पाण्यासाठी भटकावे लागत आहे. तशातच उन्हाच्या वाढलेल्या झळांमुळे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा सहन करत आहेत. तसेच शासनाच्या हर- घर -जल योजनेचे तर तीन तेरा वाजलेले दिसत आहेत.
तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये या योजनेचे निम्म्यापेक्षाही कमी काम पूर्ण झालेले आहे. गेले अनेक दिवसांपासून या योजनेचे काम ठप्प झाले आहे. पाण्याची गरज असताना ही योजना उपयोगात येत नाही, अडचणीच्या काळातच ही योजना ग्रामस्थांना उपयोगी पडत नसेल तर या योजनेचा फायदा काय फक्त ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनाच होणार का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता लवकरात लवकर पाणी टँकर व जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.