सोलापूर : दोन हजारांची मागणी करून तडजोडी अंती दीड हजारांची लाच घेताना सोलापूर वाहतूक (उत्तर विभाग) शाखेचा पोलीस बसाप्पा शिवाजी साखरे (वय २४) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पोलीस कॉन्स्टेबल साखरे याने तक्रारदार यांना थांबवून बुलेटचा सायलेन्सर हा कंपनीचा नाही व सदर बुलेटवर यापूर्वीचा ३ हजार रुपये दंड पेंडिंग असल्याचे सांगून तक्रारदार यांची बुलेट ताब्यात घेऊन व ती स्वतः चालवत तक्रारदार यांना पाठीमागे बसवून जेलरोड पोलीस स्टेशनजवळील ट्रॅफिक डंपयार्ड येथे आणून लावली.
त्यानंतर साखरे याने तक्रारदार यांना त्यांचे बुलेटवरील यापूर्वीचा असलेला दंड ३ हजार रुपये माफ करतो, आता सायलेन्सरचे २ हजार रुपये दे, असे बोलून पैशाची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांनी पावती मिळेल का असे विचारले, त्यावेळी पावती मिळत नसते असे सांगून पैसे लवकरात लवकर आणून दे, अशाप्रकारे लाचेची मागणी करून तडजोडीअंती एक हजार पाचशे रुपये स्वतः स्वीकारल्याने त्यास रंगेहाथ पकडले असून, त्याच्यावर जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.