सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाचा विकास करु शकतात त्यांना तिस-यांदाही पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते ( MLA Ram Satpute) यांना मोहोळ तालुक्यातून जास्तीत जास्त मतं देऊ असे आश्वासन माजी आमदार राजन पाटील (MLA Rajan Patil) यांनी दिले आहे.
यावेळी माजी आमदार राजन पाटील म्हणाले, ही सर्व देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदी यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सामान्य नागरिकांना मोफत अन्नधान्याची व्यवस्था केलीय. तसेच शेतक-यांच्या थेट खात्यावर सहा हजार रुपये देण्याची सोय केलीय. पंतप्रधान मोदीकडून मोहोळ तालुक्यात ४० गावांसह तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा नागरिकांना विश्वास आहे. त्यासाठी मोहोळ तालुक्यातील मतदारांनी आमदार सातपुते यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
पुढे पाटील म्हणाले, भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोहोळ तालुक्यामधील अनेक ठिकाणी सभा घेण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना पंतप्रधान मोदी यांचेच नेतृत्व हवे आहे. अनेक गावांमध्ये कॉंग्रेसला बूथ एजंटही मिळणार नाही. यावेळी महायुतीचे आमदार सातपुते तसेच आमदार यशवंत माने यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार यशवंत माने म्हणाले, राज्यात सर्व तालुक्यांना महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला आहे. निधी मिळाल्यामुळे विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. त्यांना कोणीही भेटून गेले तरी माजी आमदार राजन पाटील हे आपल्या शब्दांवर ठाम आहेत, त्यामुळे आमदार सातपुते यांचा विजय निश्चिच होणार आहे.
महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगतीची वाटचाल करीत आहे, प्रत्येक गावांगावांमध्ये विकासाची कामे जोरदार सुरु आहेत. देशाचा आणखीन सर्वांगीण विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी सोलापूर शहरवासियांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व मतदारांनी महायुतीच्या पाठीशी उभे राहावे.