सातारा: टेस्ला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांसह भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या संयोजन केंद्रासाठी (Assembly Hub) सातारा हा एक पर्याय आहे. टेस्ला कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकारशी आयात शुल्क, स्थानिक उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी चर्चा करत आहे. टेस्ला कंपनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि दिल्लीच्या एरोसिटीसह प्रमुख भारतीय शहरांमध्ये फ्लॅगशिप शोरूम स्थापन करण्याची योजना आखत आहे. टेस्ला एप्रिल 2026 पर्यंत भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने यापूर्वी मार्च 2025 मध्ये मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुल (BKC) येथे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीसाठी पहिले शोरूम उघडण्यासाठी पाच वर्षांचा करार केला आहे.
टेस्ला कंपनीला भारतात उच्च किंमत, चार्जिंग स्टेशन , पायाभूत सुविधा आणि टाटा मोटर्स आणि महिंद्रा सारख्या देशांतर्गत उत्पादकांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी, टेस्लाला एक मजबूत सेवा नेटवर्क स्थापित करावे लागेल, त्यांचे चार्जिंग स्टेशन वाढवावे लागतील आणि भारतीय बाजारपेठेनुसार अधिक परवडणारे मॉडेल सादर करावे लागतील. टेस्लाचे सातारा इथे प्रकल्प स्थापन करण्याचे निश्चित केल्यास इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी नक्कीच फायदा होणार आहे.
टेस्लाने भारतात नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून दिली असून वाहन सेवा आणि विक्रीपासून ते ग्राहक समर्थन आणि ऑपरेशन्सच्या पदांसाठी भर्ती सुरु केली आहे. टेस्ला त्यांचे लोकप्रिय मॉडेल्स सादर करण्याची शक्यता आहे, ज्यात मॉडेल Y, सायबरट्रक, मॉडेल २, मॉडेल ३, मॉडेल एस आणि मॉडेल एक्स यांचा समावेश आहे, ज्यांच्या अंदाजे किमती ₹४५ लाख ते ₹२ कोटी पर्यंत आहेत.