Maharashtra Politics : आगामी लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. रायगडच्या कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, सुरेश लाड यांचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत एकेकाळी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला होता. अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत हातमिळवणी केली होती.
एवढ्या मोठ्या राजकीय भूकंपानंतरही सुरेश लाड हे तटकरे यांच्या बरोबर न राहता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत राहिले होते. मात्र, आता त्यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे कर्जत येथे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडणार आहे.