कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात एका मागून एक धमाक्यांची मालिका सुरुच आहे. अशातच काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तरमधून तिकिट नाकारण्यात आल्यानंतर विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी थेट शिवधनुष्य हाती घेतलं आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये राजकीय धमाका सुरुच असल्याचे चित्र आहे. जयश्री जाधव यांना काँग्रेसकडून तिकिट नाकारण्यात आलं आहे. त्यांना नाकारून राजेश लाटकर यांना तिकिट देण्यात आले, पण त्यांच्याही उमेदवारीला विरोध झाल्याने अखेर माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जयश्री जाधव यांचा पत्ता कट…
कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर रिंगणात आहेत. जयश्री जाधव यांच्या बंडखोरीने त्यांना ताकद मिळाली असून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य रंगले आहे. मतदारसंघ कोणाला मिळणार ते उमेदवारी कोणाला मिळणार? असा खेळ रंगला होता. भाजपकडून महाडिक यांनीही डाव टाकल्यामुळे राजेश क्षीरसागर अडचणीत आले होते. मात्र, शिंदे यांनी क्षीरसागर यांनाच उमेदवारी दिली. दुसरीकडे, काँग्रेसमध्येही राजेश लाटकर यांच्या उमेदवारीवरून गोंधळ उडाला. त्यामुळे उमेदवार बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली.
कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे बळ..
दरम्यान, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर आणि विधानपरिषदेतील दोन आमदार असे पाच आमदार काँग्रेसचे आहेत. स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांनी करवीरमध्ये दिलेल्या मताधिक्याने शाहू महाराजांचा विजय निश्चित झाला. मात्र, कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये शाहू महाराजांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नव्हतं. कोल्हापूर दक्षिणमधून अवघ्या 6 हजार 702 मतांची आघाडी शाहू महाराजांना मिळाली. कोल्हापूर उत्तरमध्ये 14 हजार 528 मतांची आघाडी मिळाली होती. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात विद्यमान काँग्रेस आमदार आहेत. दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील, तर उत्तरमध्ये जयश्री जाधव आमदार होत्या.