सोलापूर : शरद पवार (sharad Pawar) हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी एक सूचक विधान केले आहे. शरद पवार म्हणाले की, या मेळाव्यात मला काही प्रश्न सांगितले गेले. हे प्रश्न काही राज्य सरकारशी संबंधित आहेत, तर काही केंद्र सरकारशी संबंधित आहेत. मी सध्या कुठेच नाही. त्याची चिंता करू नका. कुठे नसलो तरी सगळीकडे आहे, असं सांगतानाच मी सर्व गोष्टींची नोंद घेतली आहे. मी प्रमुख लोकांशी चर्चा करून या जिल्ह्यातील शेतीचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. जिल्ह्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र आणि राज्याशी मी बोलेन, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली. याचवेळी ‘ मी कुठेही नसलो तरी सगळीकडे आहे’, या विधानाची राजकारणात चर्चा रंगली आहे.
या वेळी प्रश्नांवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, राजकारणात मनासारखे काम केले नाही तर दबाव आणला जातो. अनेकदा चांगले काम करणाऱ्याला खड्यासारखे उचलून बाजूला केले जाते. कर्जमाफीत कुणाची फसवणूक झाली असेल, कुणी दबावाचे राजकारण करत असेल तर तो दबावही संपवायचा कसा याचा विचार करू.
या वेळी शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या ‘शरद पवार यांना शेतीतील काय कळतं’ या विधानाचा किस्सा सांगत शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. अमित शाह या जिल्ह्यात आले होते. निवडणुकीच्या आधी त्यांनी हेच सांगितलं होतं. शरद पवारांना काय समजतं? असं ते म्हणाले होते. त्यानंतर लोकांनी त्यांच्या उमेदवाराचा पराभव केला आणि सांगितलं, शरद पवार यांना हे समजतं आणि नीट नेटकं समजतं, असा हल्लाबोलच पवार यांनी केला