कागल : भाजप नेते समरजित घाटगे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कोल्हापुरातील कागलमध्ये गैबी चौका भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कागलने कधीही लाचारी स्वीकारली नाही, तसा इथला इतिहास नाही.
ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांना दिला. यावेळी समरजित घाटगे यांची उमेदवारी जाहीर करत शरद पवारांनी मोठी घोषणा केली. तुम्ही समरजित घाटगे यांना आमदार करा. ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू, असा शब्द शरद पवार यांनी दिला.
काय म्हणाले शरद पवार?
तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर समरजीत घाटगे यांना विधानसभेवर पाठवा. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर समरजीत घाटगे फक्त आमदार राहणार नाहीत, तर त्यांना आवश्यक काम करण्यासाठी मोठी संधी देणार. हा विचार माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर समरजीत घाटगे यांना मंत्री करणार. कागलमध्ये लाल दिव्याची परंपरा कायम राहणार, असे सूतोवाच शरद पवार यांनी यावेळी दिले.
पुढे बोलताना म्हणाले, कागलमधून आम्ही एका व्यक्तीला सर्वकाही दिलं. मात्र संकट आल्यानंतर साथ सोडून भलत्याच्याच मागे गेले. त्यांच्यावर ईडीच्या काही चौकशा सुरू केल्यानंतर ते अस्वस्थ झाले. त्यांच्या कुटुंबीयांतील भगिनींनी ईडीने आम्हाला गोळ्या घालाव्या अशी भूमिका घेतली. मात्र त्यांचा कुटुंबप्रमुख लाचार होऊन भ्रष्टाचाऱ्यांच्या दारी गेला. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच शरद पवारांनी दिला.
संकट आल्यावर पळून जाणे, लाचारी स्वीकारणे हा कागलचा इतिहास नाही. ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. समरजीत घाटगेंचा पक्षप्रवेश ही परिवर्तनाची नांदी आहे. आता राज्यात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असंही शरद पवार यावेळी म्हणाले. या आधी अनेकदा गैबी चौकात सभा घेतल्या, मात्र, आजची सभा ही वेगळी असून नजर जाईपर्यंत माणसांची गर्दी दिसत आहे. त्यावरून कागलमधील तरूणापासून ते वृद्धापर्यंत सर्वांनीच समरजीत घाटगेंच्या पाठीशी उभे राहण्याचा निश्चय केल्याचं दिसत आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.