-प्रकाश सुरवसे
मोडनिंब : येथील मुख्य टपाल कार्यालयात महिनाभरापासून पावती मिळत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी गरजूंना जास्त किंमत मोजून पावती तिकिटे गरजेला मिळवावी लागत आहेत.
मोडनिंब आणि मोडनिंब परिसरातील अरण व बावी शाखा पोस्ट ऑफिस मध्ये देखील पावती तिकिटे मिळत नाहीत. मोडनिंब सब पोस्ट कार्यालयाअंतर्गत असलेल्या मोडनिंब, बैरागवाडी, जाधववाडी, सोलकरंवाडी, अरण, बावी या आसपासच्या गाव आणि वाडी वस्तीवरील शेकडो नागरिकांचा वावर असतो. विविध कारणामुळे नागरिकांना पावती तिकिटाची गरज भासते. तिकिटे उपलब्ध होत नसल्याने गरजूंना ज्यादा किंमत मोजून पावती तिकीट मिळवावे लागत आहे. पावती तिकिटाचा तुटवडा झाल्यामुळे अनेक जण एकमेकांकडून विचारणा करून तिकीट उपलब्ध करून घेत आहेत.
मोडनिंब च्या मुख्य टपाल कार्यालयासाठी दर महिन्याला अंदाजे दोन हजार पावती तिकिटे उपलब्ध असावी लागतात. महिनाभरापासून एकही तिकीट नसल्यामुळे गरजू नागरिक पोस्टमध्ये फेऱ्या घालत आहेत. वरिष्ठ कार्यालयाने या बाबीकडे लक्ष घालून पावती तिकिटे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
महिनाभरापासून पावती तिकीट उपलब्ध नसल्याने येणाऱ्या नागरिकांना पावती तिकिटे मिळू शकत नाहीत. पंढरपूर अधीक्षक कार्यालयातच तिकिटे उपलब्ध नसल्यामुळे कधी तिकिटे येतील सांगता येत नाही.
-संदेश साळुंखे, पोस्ट मास्तर, मोडनिंब सब पोस्ट ऑफिस.अरण येथील विलास जाधव, मोडनिंब येथील अमित काळे यांच्यासह अनेकांनी पावती तिकिटांसाठी मोडनिंब टपाल कार्यालयात मागणी केली मात्र तिकिटे उपलब्ध झाली नसल्याने माझ्यासह सर्वांना ज्यादा दराने पावती तिकिटे खाजगी ठिकाणाहून विकत घ्यावी लागली.
-लक्ष्मण खडके, शेटफळ, ता. मोहोळ