सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात दौऱ्यावर आहेत त्यांच्या हस्ते शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील रे नगर प्रकल्पातील असंघटित कामगारांच्या पहिल्या टप्प्यातील ३० हजारपैकी १५ हजार घरकुलांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. रेनगरातील पाच घरकूल लाभार्थीना प्रातिनिधीक स्वरूपात चावी वाटप आणि लोकार्पण सोहळा सकाळी दहा वाजता पार पडणार आहे
याप्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक, माजी आमदार नरसय्या आडम याचं पाच मिनिटांचे प्रास्ताविक होईल स्वागत सत्कार होऊन प्रकल्पाची काही मिनिटांची चित्रफीत दाखविली जाईल, त्यानंतर राज्यात व केंद्रातील काही प्रमुख मंत्र्यांची भाषणे होतील. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंघटित कामगारांशी संवाद साधणार आहेत.
भूमिपूजन केले, आता उद्घाटनही करणार
९ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रे नगर घरकुल प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. चार वर्षांनंतर पंतप्रधान मोदी हे प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांची कामेदेखील सुरू आहेत.