Sangli News जबलपूर: जबलपूरहून बंगळूरूला जाणाऱ्या सैन्य दलाच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. पाठीमागून आलेल्या एका टँकरने सैन्य दलाच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका जवानाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात सांगली जिल्ह्यातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली.
सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गावचे पॅरा कमांडोचे हवालदार पोपट खोत यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्यांचा सहकारी एक जवान गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जबलपूर जवळ हा अपघात झाला. रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच पोपट खोत यांचा मृत्यू झाला. पोपट खोत यांच्या मृत्यूची वृत्त कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली. अत्यंत हुशार आणि मनमिळावू असलेल्या पोपट यांनी आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. मात्र, आता त्याच्या अपघाती जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
पोपट खोत हे 34 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि बहिणी असा परिवार आहे. हवालदार पोपट खोत यांचं पार्थिव त्यांच्या गावी लोणारवाडी येथे आणले जात आहे. कर्त्यव्य बजावत असताना, खोत यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. खोत यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी आणण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.