लहू चव्हाण
पांचगणी : ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’मध्ये पुणे विभागामधील ‘क’ वर्ग नगरपरिषदांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात घवघवीत यश मिळवले आहे.
प्रशासकीय काळातही पांचगणी नगरपालिकेने मिळविलेल्या या यशाबद्दल पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत मुख्याधिकारी निखिल जाधव यांना पत्र पाठवून विशेष अभिनंदन केले आहे. या पत्रात आयुक्त सौरभ राव यांनी नगरपरिषदेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. आपली शहर विकासाप्रतीची बांधिलकी, शहर सक्षम बनविण्यासाठी दिलेले योगदान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची तयारी यामुळे ही कामगिरी आपण उत्कृष्टरित्या पार पाडण्यात यशस्वी झाला आहात. आपल्या नेतृत्वाखाली कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत आणि आपला दृढनिश्चय यामुळे हे शक्य झाले. पुणे विभागातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आपले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे, असा उल्लेख राव यांनी पाठविलेल्या पत्रात केला आहे.
शहर अधिक स्वच्छ, सुंदर, सक्षम व शाश्वत बनविण्यासाठी राव यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. दरम्यान, मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल नगरपालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.