बार्शी (सोलापूर) : महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे वाटप करण्याचे अधिकार नसताना संगनमत करून वाटप करून सातबारा हक्कपत्रकी बेकायदेशीर नोंद घेतली. याप्रकरणी बार्शी येथील रघुनाथ ढगे, नायब तहसीलदार माजीद काझी, मंडल अधिकरी उमेश डोईफोडे, तलाठी महेश गरड यांच्यावर बार्शी शहर पोलीस स्टेशन यांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग बार्शी न्या. जे. आर. पठाण यांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, लिंबराज ढगे यांच्या मालकीची शहर हद्दीतील जमीन गट नं. ६३८ आहे. या जागेबाबत बार्शी न्यायालयात वाटपाचा प्रलंबित असताना लिंबराज ढगे यांची कोणतीही संमती नसताना त्यांची बनावट सही, बनावट प्रतिज्ञापत्र करून तेच आहेत असे भासवण्यासाठी बनावट व्यक्ती उभा केला.
ढगे यांच्या परवानगीशिवाय तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या संमतीशिवाय महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे वाटप करून सातबारा हक्कपत्रकी बेकायदेशीर नोंदी घेतल्या. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे नायब तहसीलदार, मंडल अधिकारी यांना वाटप करण्याचे अधिकार नसताना देखील वाटप करून नोंदी घेतल्या आहेत.
ढगे यांनी बेकायदेशीर नोंदी रद्द व्हावी. तसेच नायब तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, म्हणून महसूलच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे अॅड. नितीन शिंदे यांच्या मार्फत न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जासोबत दाखल केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून वरीलप्रमाणे बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.