पाचगणी : सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर, पाचगणीला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी जास्त असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. परिणामी, पर्यटकांचा चांगलाच हिरमोड होत असे. ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन आता चेकपोस्टवर फास्टॅग प्रणालीद्वारे पर्यटकांकडून प्रवासीकर, प्रदूषणकर घेतले जाणार आहेत. याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या.
सलग सुट्ट्यांमुळे पाचगणी, महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी गर्दी असते. चेकपोस्टवर गाड्या थांबवून पर्यटकांकडून प्रवाशीकर व प्रदूषणकर घेतला जातो. त्यामुळे सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने पर्यटक मोटारीतच अडकून पडत होते. हे विचारात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पाचगणीचे मुख्याधिकारी निखिल जाधव, महाबळेश्वरचे मुख्याधिकारी योगेश पाटील आणि टोल ठेकेदार यांची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करून त्वरित फास्टॅग प्रणालीद्वारे प्रवाशीकर व प्रदुषणकर घेण्याच्या सूचना दिल्या.
दोन्ही नगरपरिषदेस सूचना देताना जिल्हाधिकारी म्हणाले, फास्टॅगबाबत स्थानिक स्तरावर व्यापक प्रसिद्धी देऊन त्याबाबत उपाययोजना त्वरित करण्यात यावी. फास्टॅग प्रणालीद्वारे दोन्ही नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असून, त्याबाबत कार्यवाही करून येणारे पर्यटकांच्या सोयीसुविधेत वाढ होणार आहे.