करमाळा : करमाळा तालुक्यातील एसटी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी वांरवार बंद पडणाऱ्या नादुरुस्त एसटी बस स्पेशल केस म्हणून दुरूस्त करून देणार असल्याचे आश्वासन सोलापूर जिल्हा वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांनी यांनी दिले आहे. तालुक्यातील एसटी बस वांरवार बंद पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत प्रा. रामदास झोळ यांनी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नवीन चाळीस गाड्या देण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा विभागीय वाहतूक शाखेचे प्रमुख अजय पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनाही देण्यात आले असून त्यांनीही याबाबत तीन जानेवारी रोजी बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. एसटी वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांनीही स्पेशल केस म्हणून नादुरुस्त बस दुरुस्त करून घेऊन प्रवाशांची गैरसोय दूर करून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, ॲड. राहुल सावंत हरिदास मोरे, अंजनगावचे उपसरपंच शहाजी माने त्यांच्यासह शेतकरी नागरीक उपस्थित होते.