अहमदनगर: राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. अहमदनगर येथे तर प्रचाराच्या अगदी सुरुवातीलाच उमेदवार एकमेकांना आव्हान देत जोरदार टीका करत आहेत.
काही दिवसांपूर्वी विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील म्हणाले, मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली, तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. त्यानंतर माजी निलेश लंके यांनी देखील विखे यांच्यावर जोरदार पलटवार केला होता.
आता परत एकदा निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यावर जोर टीका केली आहे. यावेळी एक्सवर (जुने ट्विटर) एक पोस्ट करत लंके म्हणाले की, ”समोरच्या उमेदवाराची मला गंमत वाटते. ते काल-परवा मला इंग्रजी बोलून दाखव म्हणत होते आणि आज त्यांची एक ऑडीओ क्लिप माझ्या ऐकण्यात आली. त्या भाषणात ते म्हणत आहेत की, त्यांना मराठी वाचायलाच येत नाही. त्यांच्या या विधानावर हसावं की रडावं हेच कळत नाही”.
”महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदारसंघाच्या खासदाराला मराठी वाचता येत नाही, ही अभिमानाने मिरविण्याची गोष्ट मुळीच नाही. उलट ज्या मराठी भाषक राज्यासाठी १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्या हुतात्म्यांचा देखील हा अपमान आहे. समोरच्या उमेदवाराला कदाचित याची जाणीव नसावी. असो. !
खरंतर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाला मराठी भाषेत वाचायला आणि बोलायला आलंच पाहिजे. पण ‘समोरच्या उमेदवाराला’ मराठी वाचायला येत नसेल तर त्यांना मी मराठीतला एखादा उतारा वाचून किंवा लिहून दाखविण्याचे आव्हान देणार नाही. त्यांची हेटाळणी देखील करणार नाही. उलट त्यांनी मराठी वाचायला आणि लिहायला जरुर शिकावे, असे आवाहन मी नक्की करेन. कारण ते सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासारख्या मोठ्या माणसाचे पणतू आहेत. त्यांना मराठी लिहीता-वाचता आलेच पाहिजे. ते लवकर शिकतील ही अपेक्षा आहे. यासाठी त्यांना शुभेच्छा”, असंही लंके यांनी म्हटले आहे.
समोरच्या उमेदवाराची मला गंमत वाटते. ते काल-परवा मला इंग्रजी बोलून दाखव म्हणत होते आणि आज त्यांची एक ऑडीओ क्लिप माझ्या ऐकण्यात आली. त्या भाषणात ते म्हणत आहेत की त्यांना मराठी वाचायलाच येत नाही.
त्यांच्या या विधानावर हसावं की रडावं हेच कळत नाही.
महाराष्ट्रातील महत्वाच्या… pic.twitter.com/oVkfCZKhDM— Nilesh Lanke – निलेश लंके (@Nilesh_LankeMLA) April 4, 2024