कराड: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एसटीआर-१ या वाघाचा वावर असताना आता आणखी एका नवीन वाघाचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आगमन झाल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यामुळे समोर आले आहे. २८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी हा वाघ कॅमेरात कैद झाला असून त्याचे एसटीआर-२ असे नामकरण करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामधून सुमारे १०० किमीचे अंतर कापून हा वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिलारी ते राधानगरी व राधानगरी ते सह्याद्री हा व्याघ्र भ्रमणमार्ग वाघांच्या संचारासाठी अनुकूल असल्याचे अधोरेखित झाले आहे.
२०१८ नंतर प्रथमच १७ डिसेंबर २०२३ रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एका वाघाची नोंद झाली होती. या वाघाचे ‘एसटीआर-१’ असे नामकरण करण्यात आले होते, तसेच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वर्षभरापासून दैनंदिन गस्ती, पीआयपी व कॅमेरा ट्रपच्यामाध्यमातून नियमित देखरेख करण्यात येत आहे. सह्याद्रीतील मुसळधार पावसातही वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वाघाच्या हालचालींवर यशस्वीरित्या देखरेख ठेवली आहे. विशेष म्हणजे एसटीआर-१ या वाघाचे वर्षभरापासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातच वास्तव्य असल्याने या प्रकल्पामध्ये वाघांसाठी अनुकूल अधिवास व भक्षय प्राण्यांची संख्या पुरेशी उपलब्ध असल्याचे अधोरेखित झाले आहे.