अहमदनगर : येथील दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 18 लाख 88 हजार रुपयांचे शुल्कदेखील भरले आहे.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत-जामखेड 5, राहुरी 5 अशा केंद्रावरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा 28 हजार 929 मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी त्यांचा पराभव केला. निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांत उमेदवाराने पडताळणी संदर्भात मागणी करायची असल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी 10 जून रोजीच निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. मात्र याबाबत सुजय विखेंच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.
भारत निवडणूक आयोगाकडे डॉ. सुजय विखे पाटील यांचा हा प्रस्ताव जाणार आहे. 45 दिवसांच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली तर, न्यायालयाच्या परवानगीने पडताळणीचा निर्णय होणार आहे. जर कोणी न्यायालयात गेले नसल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही होईल, असे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.