सोलापूर : तेलंगणामधील राष्ट्रीय स्तरावर झालेल्या हिंद केसरी स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राला यश मिळाले आहे. महाराष्ट्राचा सोलापूर जिल्ह्यातील पैलवान समाधान पाटील याने कुस्तीचे मैदान गाजवले आहे. समाधान हा २०२४ सालचा हिंदकेसरी ठरला आहे. दिल्लीचा मल्ल बोलू खत्री याचा पराभव करत समाधानने हिंद केसरीवर आपले नाव कोरले.
भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा म्हणून हिंद केसरी स्पर्धा ओळखली जाते. समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. यावर्षीचा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्याला मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या विजयामुळे हिंद केसरीची गदा सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रात आली आहे.
२०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेत अभिजीत कटके यांनी हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव करुन विजेतेपद मिळवले होते. अभिजीत कटके हा २०१७ सालच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आहे.
समाधान पाटील हा मूळचा मोहोळ तालुक्यातील पिंपरी गावचा रहिवासी आहे. समाधान २०१० पासून पैलवानकी करत आहे. यापूर्वी त्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या ‘सीएम केसरी’चा किताब तसेच २०१७ सालचा ‘उपमहाराष्ट्र केसरी’ किताब पटकवला आहे. समाधान पाटील हा सोलापुरातील भरत मेकाले यांच्या तालमीत सराव करत होता. त्यानंतर काही काळ दिल्लीतही सराव केला आहे.
समाधान पाटील हा शेतकरी कुटुंबातला आहे. शेती हा त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे. मागील वर्षी ‘हिंदकेसरी’चा किताब महाराष्ट्रातील अभिजीत कटके याने पटकावला होता. त्यानंतर यंदाच्या वर्षी समाधान पाटील याने हा किताब पटकावल्याने राष्ट्रीय स्तरावर कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे.