Karmala: जिंती : जिंती (ता. करमाळा) ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी मनोहर पाटील यांची बकरी बिबट्याने फस्त केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यापूर्वीही बिबट्याने अनेकदा जनावरांवर हल्ले केले आहेत. पण जिंती येथे बिबट्याने केलेला हल्ला अधिक भयानक आहे, कारण घरासमोरून बिबट्याने बकरी नेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील जिंती, टाकळी, खातगाव, कोंढार चिंचोली व कात्रज या गावांमध्ये ऊसाची शेती अधिक असल्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. या परिसरातील शेळी, मेंढी, गाई यांच्यावर बिबट्या हल्ले करत आहे. तसेच बिबट्या लोकवस्तीमध्ये शिरकाव करू लागला आहे. अनेक महिन्यांपासून याच परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. त्यामुळे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान, जिंती परिसरात महाविवरण कंपनीकडून रात्रीच्या वेळी शेतीसाठी विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या शेतातील पिकांना रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागते. रात्रीच्या वेळी शेतकरी एकटाच शेतात दारी धरीत असतो. अशा वेळी बिबट्याने एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला केल्यावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांनी आपल्या गोठ्यांना बंदिस्त करून घ्यावे व शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी जाताना एकटे जाऊ नये. तसेच वनविभागाने या घटनेचे तत्काळ गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित पिंजरा लावावा. – ॲड. नितीन राजेभोसले