कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये काल(8 ऑगस्ट) भीषण आगीत ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाले. या नाट्यगृहाला शंभर वर्षांपूर्वीची मोठी परंपरा आहे. राजाराम महाराज यांनी करवीर संस्थांमधील कलाकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून पॅलेस थेटरची निर्मिती करण्यात आली होती. नंतर त्याचे रूपांतर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झाले होते. हे नाटयगृह आगीत जळून खाक झाल्याने सिनेसृष्टीतील कलाकारांनी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली आहे.
आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती होती. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन देखील नाट्यगृह परिसरात करण्यात आलं होतं. मात्र, रात्रीच या नाट्यगृहाला आग लागल्याने हे नाट्यगृह जळून खाक झालं आहे. संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या 134 व्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडली आहे. अग्नीशमन दलाच्या 15 ते 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीने एवढे भीषण रूप घेतले होते कि त्यामुळे सभागृहाचा फक्त सांगाडाच राहिला आहे.
तब्बल तीन तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आल आहे. घटनास्थळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही भेट दिली. दरम्यान, या नाटयगृहात अनेक अजरामर नाटके झाली असून अनेक मोठे कलाकार घडले आहेत. राजश्री शाहू महाराजांनी बांधून दिलेला हा राजाश्रय ढासळल्याचे पाहताना अनेक कलाकारांचे मनं हळहळली तर अनेकांना अश्रू अनावर झाले.