लहू चव्हाण
पाचगणी : मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्यावे, यासाठी लढणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सभा वाई येथे शनिवारी (ता. १८) होत असून, या सभेसाठी महाबळेश्वर तालुक्याच्या पूर्व भागातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या सभेसाठी जाणार असल्याचा विश्वास मराठा समन्वय समितीच्या वतीने राजेंद्र शेठ राजपुरे यांनी व्यक्त केला.
वाई येथे शनिवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या सभेसाठी महाबळेश्वर तालुक्यातून जास्तीत जास्त मराठा बांधव उपस्थित राहावे, यासाठी पाचगणी येथील विश्रामगृहावर नुकतीच नियोजनाची विशेष बैठक झाली. पाचगणी आणि परिसरातील बहुसंख्य मराठा बांधव या बैठकीला उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणावेळी राज्य सरकारने बळाचा वापर करून उपोषण उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृत्यामुळे मराठा समाज पेटून उठला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांची सभा वाई येथे होणार असून, सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या सभेला महाबळेश्वर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने मराठा समाज वाईमध्ये एकवटणार आहे.
पांचगणी आणि परिसरातून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गावागावांत जनजागृती करून जास्तीत जास्त युवक-युवतींना या मोर्चात सहभागी करून घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. अशीच एकी यापुढेही सर्व प्रश्नांसाठी ठेवूया व आपल्या समाजाचा विकास करू असेही यावेळी सांगण्यात आले.
जरांगे-पाटील यांच्या सभेच्या निमित्ताने पांचगणीमधील सर्वपक्षीय मराठा नेते, कार्यकर्ते सकल मराठा समाजाच्या फलकाखाली एकत्र आल्याचे दिसून आले. या वेळी राजेंद्र शेठ राजपुरे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासूर्डे, शेखर कासूर्डे, प्रवीण भिलारे, अंकुश मालुसरे, अमोल भिलारे, अजित कासूर्डे, सुनील बिरामने, शरद कासूर्डे, संतोष बेलो, विनोद कळंबे, राजेंद्र भिलारे, रुपेश बगाडे, सूर्यकांत कासूर्डे, महेश खांडके, गणेश राजपुरे तसेच विविध गावचे ग्रामस्थ व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.