जिंती (करमाळा) : विद्यालयात सन 2003 -04 ला दहावीच्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी एकमेकांसमोर आल्याने एकमेकांना ओळखू शकत नव्हते. परंतु, ओळखल्यानंतर डोळ्यातील निरागस मैत्री जशीच्या तशी समोर आली. आणि त्याच लाकडी बाकांवरती पुन्हा एकदा आपल्या आवडत्या सवंगड्या बरोबर बसण्याची हौस प्रत्येकाने भागवून घेतली. आनंद, आश्चर्य आणि कौतुक अशा संमिश्र भावना सवंगड्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. याचे निमित्त होते ते स्नेहसंमेलनाचे. जिंती (ता. करमाळा) येथील शहाजीराव उमाजीराव राजेभोसले हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 20 वर्षानंतर शाळा शनिवारी (ता.27) भरली होती.
शहाजीराव उमाजीराव राजेभोसले हायस्कूलमध्ये दहावीच्या काही माजी विद्यार्थ्यांनी वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपमध्ये सन 2020 ला 5 ते 10 मित्र एकत्र आले. कोरोना निर्बंध असल्याने पुढील तीन वर्षे गेट टुगेदर व्हाटसअॅपवर ग्रुपवरच झाले. त्यानंतर काही मुली पण त्यामध्ये अॅड झाल्या. आणि आपल्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घ्यावा, असे ठरविण्यात आले होते. त्यानुसार एस.यू. राजेभोसले हायस्कूलमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे शनिवारी (ता.27) स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. या स्नेह मेळाव्यात 30 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.
यावेळी केंद्रप्रमुख महावीर गोरे, मुख्याध्यापक बाळासाहेब काटे, माजी शिक्षक अशोक ढवळे, भानुदास वारघड, सुरेश शिंगाने, सुनील भांडवलकर, रामहरी झांजूर्णे, पांडुरंग दिवसे, काळे सर, शिक्षकेतर माजी कर्मचारी विठ्ठल शेजाळ,भीमदेव जगताप, रामहरी तरटे आदी मान्यवर उपस्थित होते
सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांनी आपला परिचय करून दिला. शालेय जीवनातील काही गंमतीदार आणि काही विनोदी आठवणींना उजाळा दिला. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो, हे विसरून गेले होते.
दरम्यान, माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिमेंटचे बाकडे भेट स्वरूपात मुख्याध्यापक बाळासाहेब काटे यांच्याकडे सुपूर्त केले. शाळेतील माजी विद्यार्थी आज राजकारण, शिक्षण, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत असून ते आपल्या क्षेत्रात कामाचा वेगळा ठसा उमटवत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले, तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्यानंतर स्नेह भोजन व फोटोसेशन झाले. अनेकजण हे आनंदी क्षण आपल्या कॅमेर्यात टिपत होते. या आनंदयात्री सोहळ्यात सर्वच जण हरखून गेले होते. अशा पद्धतीने शाळेचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी बोलताना अश्पाक शेख म्हणाले की, आज आपण विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करीत आहोत. त्याचे सर्व श्रेय जाते ते. आपल्याला चांगले शिक्षण देणारी शाळा व शिक्षकवृंद होय. आपण ज्या शाळेत शिकलो व चांगल्या प्रकारे घडलो. या शाळेमुळेच आज मी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आपण शाळेला विसरून जाता कामा नये. आपण शाळेला आपापल्या पद्धतीने सर्वोतोपरी मदत केली पाहिजे. तसेच या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.
यावेळी बोलताना माजी विद्यार्थी गुरुनाथ भारती म्हणाले कि, शाळेतील दहावीच्या वर्गात शिकणारे सर्व विद्यार्थी एकत्र आल्याने खूप आनंद झाला आहे. एकमेकांना भेटल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या पुढील काळात सर्व मित्रांनी एकमेकांच्या सुख दुख:त राहिले पाहिजे. व आपल्या आलेल्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. मी सर्व मित्रांच्या सोबत असून, आलेल्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणार आहे.
यावेळी बोलताना माजी शिक्षक अशोक ढवळे म्हणाले की, 20 वर्षानंतर विद्यार्थी त्याच बाकावर बसलेले पाहून खूप आनंद झाला आहे. विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून मोठ मोठ्या हुद्द्यावर काम करीत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या हातून जे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले ते आज सार्थ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि हा स्नेह सोहळा आयोजित करून आम्हाला यथोचित सन्मान केला. त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो.