सोलापूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सोलापूर जिल्हा अध्यक्षपदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढविलेले माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील हे स्वगृही परतणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची पुन्हा एकदा वर्णी लावण्यात येणार असल्याचे अधिकृत वृत्त आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघ हा महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे गेला होता. माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उबाठाकडून निवडणूक मैदानात उतरले. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. दरम्यान, साळुंखे-पाटील यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाला जिल्हाध्यक्षाविना निवडणुकीला सामोरे जावे लागले होते.
निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्यासह संजयमामा शिंदे, राजन पाटील या तीन नावांची चर्चा होती. साळुंखे-पाटील यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचे बोलले जात आहे.
साळुंखे-पाटील यांनी पुन्हा पक्षात यावे: राजेंद्र हजारे
माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी जनतेच्या आग्रहाखातर विधानसभेची निवडणूक लढविली. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी सर्व घटकांना एकत्रित घेऊन काम केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षसंघटनेला त्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावे आणि त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद देण्याकामी जिल्ह्यातील सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते आग्रही आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहकार विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे यांनी सांगितले.