रायगड : रायगड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे रायगड किल्ला पर्यटकांसाठी आजपासून (दि. 8 जुलै) बंद करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे प्रशासनाकडून तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जुलैपर्यंत रायगड पर्यटकांसाठी बंद असणार आहे.
रायगड किल्ल्यावर रविवारी झालेल्या मुसळधार पावसात एक पर्यटक वाहून गेला आहे, त्यानंतर आता रोप वेसह पायरी मार्ग देखील बंद केले आहेत. पायी जाणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग टाकून बंद करण्यात आला आहे. तसेच रायगड किल्ले परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रायगडमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. काही भागात ढगफुटी झाल्यामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. किल्ले रायगडावर देखील ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने महादरवाजातून पाण्याचा लोंढा वाहत आहे. मुख्य दरवाजातून पाण्याचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे. यातच रायगडावर पर्यटनासाठी आलेले शिवभक्त थोडक्यात बचावले आहेत.
आज अनेक पर्यटक रायगडावर गेले असतानाच मुख्य पायऱ्यांवरील काही भागात मोठ-मोठे धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले. दरम्यान, अनेक पर्यटक या पाण्याच्या लोंढात अडकले असून आपला जीव धोक्यात घालून या पायऱ्यांवरून वाट काढत आहेत. सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेल्या पर्यटकांना रोपवे ने गडावरुन उतरवण्यात येत आहे. यानंतर रोप वे देखील प्रशासनाकडून बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
View this post on Instagram