शिर्डी : शिर्डीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दारूची नशा एका तरूणाच्या अंगलट आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून शिर्डीला आलेल्या भाविकाचा दारूच्या नशेत हॉटेलच्या टेरेसवरून खाली पडून मृत्यू झाला आहे. शुभम नारखेडे असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील चार मित्र शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आले होते. यावेळी त्यांनी शिर्डीनजिक निमगाव कोऱ्हाळे येथील एक हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. याच हॉटेलमध्ये त्यांनी दारू पार्टी केली.
टेरेसवर पडल्याने झाला तरुणाचा मृत्यू..
दारू पार्टी झाल्यानंतर शुभम नारखेडे (25, रा. शेंभा, ता. मोताळा, जि. बुलढाणा) हा तरुण हॉटेलच्या टेरेसवर गेला. तिथे दारूच्या नशेत त्याचा टेरेसवरून खाली पडल्याने मृत्यू झाला. शिर्डी नजिक निमगाव कोऱ्हाळे येथील हॉटेल साई सिमरन येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.